कैद्यांमधला माणूस

 

      कैद्यांमधला माणूस


                               Photo Credit : Google Images

एखाद्या बेकायदेशीर  कृतीला गुन्हा अशी संज्ञा देता येईल. गुन्हा सिद्ध झाला की शिक्षाही अपरिहार्यच. अर्थात कायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीवर गुन्हेगारीचा शिक्का बसला की अशा व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन संपूर्णतः बदलून जातो.  अशा लोकांचा क्वचितच पुन्हा माणूस म्हणून समाज स्वीकार करतो. एक प्रकारे त्यांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो. केलेल्या गुन्ह्यासाठी बरेचवेळा कारावासही भोगायची वेळ येते.  तुरुंगात ह्या गुन्हेगारांना कैद्यांचे जिणे जगावे लागते आणि त्यांच्याकडे ‘असामाजिक घटक’, ‘गुन्हेगार’ म्हणूनच नेहमी पाहिले जाते. गुन्हेगार जरी असला तरी तो प्रथम माणूस आहे आणि गुन्हा हा त्याच्या जीवनातला एक भाग आहे याचा समाजाला विसर पडतो. पण  मुळात ‘काही व्यक्ती गुन्हेगारी कडे का वळतात?’ या प्रश्नाचे खरे उत्तर आपल्या समाजातच आहे. एमिल दारखिम (Emile Durkhime) या फ्रेंच तत्त्ववेत्त्यानं सांगितलं की कोणतीही असामान्य वागणूक ही समाजाच उत्पत्ती आहे.

       अलीकडेच जेव्हा मला एका प्रकल्पा अंतर्गत जेल मधल्या रहिवाश्यांबरोबर  काम करण्यासाठी विचारणा झाली तेव्हा मी प्रथम नकार द्यायचेच निश्चित केले होते. कैदी, गुन्हेगार यांच्या विषयी समाज मनात अशा काही संकल्पना आहेत की हे स्वाभाविकच होतं. आपले कुटुंबीय, मित्र आणि अन्य घटक कळत नकळत आपल्या मनात त्याच संकल्पना रुजवत असतात आणि त्यांचा आपल्यावर खोल परिणाम होत असतो. यामुळेच माझी पहिली प्रतिक्रिया नकारात्मक झाली. मात्र थोडा विचार केल्यानंतर माझ्या मनात प्रश्न उमटला की गुन्हेगार, कैद्यंबरोबर कुणी काम करत नाहीत की काय? थोडा विचार करता लक्षात आलं की पोलिस, तुरुंग कर्मचारी, डॉक्टर्स, वकील अश्या कितीतरी मंडळींचा कैद्यांशी सतत संपर्क होत असतो. मग मी मनात पक्क केलं की कुठलाही पूर्वग्रह बाळगायचा नाही आणि स्वानुभव घ्यायचा. नंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे घरच्यांची अनुमती मिळवणे हा होता. अट्टल गुन्हेगारांसाठी असलेल्या मुंबईतल्या आर्थर रोड जेल मध्ये माझे पुरुष वॉर्डात पोस्टिंग होणार होतं. कुख्यात दशतवादी कसाबला याच तुरुंगात अंडा सेल मध्ये ठेवलं होतं हे आपणा सर्वाँना माहितीच आहे. थोडं धैर्य एकवटून माझ्या मनातला विचार आई वडिलांना सांगितला. अनपेक्षितपणे त्यांनी तो तत्काळ उचलून धरला. पुस्तका बाहेरचं बरच काही यातून शिकायला मिळेल स्वागतार्ह भूमिका त्यांनी घेतली. ही गोष्ट माझ्यासाठी फारच उत्साहवर्धक ठरली. मी विनाविलंब प्रकल्प संचालकांना माझा होकार कळवला. "जरी उद्धरणी व्यय न तिचा हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा" ह्या विचाराचा संस्कार मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी होताच. आपल्याही शिक्षण, प्रशिक्षणाचा समाजाला थोडा फार तरी उपयोग व्हावा असं मनात होतंच. प्रकल्प धर्मार्थ असल्यानं अर्थप्राप्तीचा अर्थातच काही संबंध नव्हता. समाजऋणाची थोडीफार उतराई व्हावी हीच भावना माझीही होती.

प्रत्यक्ष काम सुरू कण्याचा दिवस उजाडला. आयुष्यात प्रथमच मी जेल मध्ये जाणार होते.  ते ही काही अट्टल गुन्हेगारांसाठी  असलेल्या मुंबईतल्या आर्थर रोड जेल मध्ये. मी काहीशी नर्व्हस होते कारण  समाजातल्या विविध घटकां बरोबर संवाद हा जरी माझ्या अंगवळणी पडलेला असला, किंबहुना माझ्या रूचीचा विषय असला, तरी इथे संवाद साधायचा होता तो समाजाने बहिष्कृत केलेल्या किव्हा न्यायपालिकेने दंडित केलेल्या अट्टल गुन्हेगारां बरोबर आणि हे मी प्रथमच करू जाणार होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर, आर्थर रोड जेल आणि तेथील गुन्हेगार यांच्या विषयी आपणा सर्वांनाच माध्यमांतून जे  काही ऐकायला, वाचायला मिळत असतं त्यावरून तिथलं वातावरण  निश्चितच संवाद पूरक नसणार अशी माझी अटकळ होती.

          कारागृहाच्या परिसरात प्रवेश केला तेव्हा तिथे लागलेली लांबच लांब रांग पाहून मनाला काहीशी विषण्णता आली.

सूर्य माथ्यावर होता. ऊन खूप कडक होतं. सर्व लोक खूप वेळ रांगेत उभे असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. हे लोक कोण आहेत आणि रांगेत का उभे आहेत, याची चौकशी केली तेव्हा एका पोलीस कर्मचाऱ्यानं शांतपणे उत्तर दिलं की ते  जेल मध्ये राहणाऱ्यांचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी त्यांनी रांगा लावल्या आहेत. उत्सुकता आणि काळजी यांचा मिलाफ रांगेतील प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या गेटपाशी गेलो, तिथे बरेच पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी होते. एका दरवाजा बाहेर आम्ही उभे होतो. कधीही न पाहिलेल्या एका वेगळ्याच जागात आपण प्रवेश करणार आहोत हे सतत जाणवत होतं. दरवाज्याच्या आत राहणारी लोकं समाजात कशाप्रकारे ओळखली जातात आणि एकाकीपणानी त्यांचं आयुष्य कसं व्यापून जातं याची जाणीव होऊ लागली.  दरवाजातून आत जाण्यासाठी कडक सुरक्षा आणि ओळखपत्र पडताळल्या जात होती. त्यातून प्रवेश केल्यावर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात होती. आम्हाला योग्य ती सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्यात दोन पुरुष पोलिस आणि एक महिला पोलिस शिपाई देण्यात आले होते जे जेलमध्ये सतत आमच्यासोबत होते. आम्ही समुपदेशनासाठी नेमलेल्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा माझ्यासह सर्व टीम सदस्यांच्या मनात अजूनही एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. अखेरीस आमच्यातील एकानं आपण आधीच थोडं नर्व्हस होतो आणि आता प्रत्यक्षात जेल मध्ये दाखल झाल्यानंतर नर्व्हसनेस अधिकच वाढला असल्याची कबुली दिली. त्याच्या ह्या भावनेशी सर्वांनी लगेचच सहमती दर्शवली. 

          मी जेव्हा पहिलं सत्र सुरू केलं, तेव्हा  काय ऐकायला मिळेल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती आणि क्लायंटला empathy दर्शवू शकण्याच्या माझ्या क्षमतेवर मनात एक प्रकारचं प्रश्नचिन्ह होतं. अजय (नाव बदललं) ह्या माझ्या पहिल्या क्लाएंट वर कलम 302 अन्वये खटला सुरू होता. गुन्हा अद्याप सिद्ध व्ह्यायचा होता. खटला सुरू असल्याने तो दोन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात होता. प्रत्येक दिवस त्याच्यासाठी किती कठीण जातो आहे हे त्यानं सांगितलं. गुन्हा दाखल होण्यापूर्वी तो दिवसभर काम करायचा. कुटुंबातला तो एकमेव कमावता होता.  त्यानं सांगितलं की त्याचा त्यानं सांगितलं की त्याचा गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. तो फक्त गुन्हा घडला त्या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून तो संशयित होता. तो त्याचं निर्दोषत्व जोरकसपणे मांडत होता. अश्या प्रकारची कहाणी असलेले काही अन्य कैदी ही त्या ठिकाणी हजर होते. त्यापैकी बहुतेकांमध्ये अँगझायटी ची  लक्षणं आढळून आली. बहुतेक जण निम्न सामाजिक-आर्थिक स्तरातले होते. भाषिक दृष्टया ही  ते प्रगल्भ नव्हते आणि  कायदा व्यवस्था आणि प्रक्रिये बद्दल त्यांना फारसं ज्ञान नव्हतं. त्यापैकी काही चाळीत राहत होते. ते गटबाजी आणि गट संघर्षाचे शिकार होते. शत्रुत्वाच्या आहारी जाऊन ते गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आणि अन्य जणांवर घटनास्थळी उपस्थित असल्यानं संशयाची सुई फिरत होती. संभाषणा दरम्यान त्यांनी सांगितलं की त्यांना बॅरेक्समध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक छोट्या बराकीत ५ ते ६ आरोपी राहतात. लहान जागा, तणावपूर्ण स्थिती आणि बराच मोकळा वेळ यामुळे तुरुंगात लहान सहान गोष्टींवरून भांडण तंटे होत रहातात. अगदी माझी चप्पल अन्य कोणी का घातली, एकमेकांच्या कपड्यांचा वापर ह्या सारखी शुल्लक कारणं ही हाणामारी पर्यंत जायला पुरेशी होती. वर्तणुकीच्या कारणावरून आपल्याला वेगळ्या बराकीत हलवण्यात आल्याची अजयची तक्रार होती. तो त्याच्या त्रासाबद्दल बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं की अश्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यांची आपण दखल ही घेणार नाही, त्यांच्यासाठी मात्र फार महत्वाच्या होत्या. विचारांती मला असं जाणवलं की आयुष्यात आपणाला महत्त्व असलं पाहिजे अशी भावना प्रत्येक माणसाची असते आणि सामाजिक दर्जा मिळवण्याच्या अंतस्त हेतूनीच आक्रमकतेचा आधार घेतला जातो.

आम्ही जस जस नवीन क्लाएंटस्  ना भेटत होतो तसं तसं आम्हा सर्वांची एकत्रित आंतरिक समज वाढत होती. माझ्या इंटर्नशिपच्या दिवसांमध्ये मी मनोविकारानं ग्रासलेले क्लायंटस् पाहिले होते, म्हणजे psychosis आणि hallucinations असलेले, पण बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी कृतीत गुंतलेल्या क्लायंटस् बरोबर कधीही सामना झाला नव्हता.

          माझा दुसरा क्लाएंट होता मनोहर (नाव बदललेलं). मनोविकृतींनी ग्रासलेला तो माझा पहिलाच क्लाएंट होता. कलम 302 अन्वये (मानवी हत्या) तो शिक्षा भोगत होता. त्याला आधीपासूनच Schizophrenia spectrum disorder असल्याचं निदान झालं होतं. काही औषध ही लिहून देण्यात आली होती. त्याला persecutory delusions (आपणाला कोणीतरी इजा किंवा मारण्याचा प्रयत्न करतोय असं सतत वाटणं) होत असल्याचा वैद्यकीय इतिहास होता. त्याच्या स्थितीची कल्पना करून मलाच खूप जड वाटू लागलं. न केलेल्या गुन्हा साठी आपल्याला शिक्षा देण्यात आली आहे असं तो सांगत होता आणि हे सर्व मला पटवून देण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करत होता. वडील आणि वहिनीच्या हत्ये साठी कलम 302, म्हणजेच खुनासाठी तो शिक्षा भोगत होता. त्यांनी सांगितलं की त्याचं परिवारातील सदस्यांवर खूप प्रेम आहे आणि त्यांना अपाय करण्याचा तो विचारही करू शकत नाही. त्या दिवशी स्थावर मालमत्ता विक्रीच्या मुद्द्या वरून काही विवाद झाला. सकृतदर्शनी मनोहर साठी ही मालमत्ता अतिशय महत्वाची होती आणि तरीही त्याला न सांगता वडिलांनी ती विकली असं त्याचं म्हणणं होतं. या घटनेमुळे तो active psychosis phase मध्ये गेला. कारण दोन दिवस तो त्याला दिलेली औषधंही घेत नव्हता. मनोहर सांगत होता की वडिलांचा खून कर असं सतत कोणीतरी सांगताय असं वाटू लागलं. वडिलांनी आपली मालमत्ता आपल्या पासून बळकावली अशी भावना प्रकर्षानं झाल्यामुळे  रागाच्या भरात त्यानं वडिलांवर हल्ला केला आणि त्यांचा मृत्यू झाला. मारहाण सुरु असतांना त्याची वाहिनी देखील घरी होती आणि तिनं कुठल्याही सामान्य व्यक्ती प्रमाणे, मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं तिला देखील ढकललं. तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिचे ही प्राण गेले. मनोहरचा ठाम समज आहे त्यानं आपल्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केली नाही. त्याला ऐकू येत असलेल्या आवाजांनी त्याला चालना मिळाली.  मला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं. मनातून मी हादरले होते पण  स्वतःला सांभाळल आणि त्याला तुरुंगातील त्याच्या अनुभवाबद्दल, होणाऱ्या त्रासाबद्दल, मनोविकृतीची काही लक्षणं आहेत का याबद्दल विचारायला सुरुवात केली. त्यानं सांगितलं की काहीवेळा जेव्हा तो औषधं घेत नाही, तेव्हा त्याला आवाज ऐकू येतात, जे त्याला सतत इतरांना मारून टाकायला सांगतात. तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधं लिहून दिली होती, परंतु अँटीसायकोटिक्सच्या परिणामा (Antipsychotics side effects) मुळे त्याला त्रास होत होता. तो सांगत होता की दिवसभर त्याला सुस्ती राहते, त्यामुळे तो काही काम करू शकत नाही. साहजिकच जेल मध्ये थोडे फार पैसे मिळवण्याची संधी ही हुकते. कौन्सिलिंग दरम्यान मी त्याच्या दैनंदिन अडचणींवर काही उपाययोजना सुचवल्या जेणे करून त्याचा तणाव काही प्रमाणात कमी होईल. 

समुपदेशन सत्र संपल्या नंतर माझ्या मनात विचार आला की मानवियतेच्या सिद्धांतानुसार (Humanistic school of thought) प्रत्येक व्यक्ती ही एक चांगली व्यक्तीच असते. आता या व्यक्तींच्या हिंसक कृती ऐकल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत समाजाचा पाठिंबा  किती महत्त्वाचा असतो. विशेषतः मानसिक आजारी व्यक्तीच्या बाबतीत. ज्या व्यक्ती तणावपूर्ण वातावरणात वाढतात त्या व्यक्ती तणाव कमी करण्यासाठी काही ना काही पर्याय, उपाय शोधून काढत असतात. यालाच मानसशास्त्रात डिफेन्स मेक्यानिझम (defense mechanism) असं म्हणतात. या संरक्षण यंत्रणा व्यक्तीपरत्वे, तसच आजू बाजूच्या परिस्थिती नुसार उपयोगी अथवा घातक असू शकतात. तणावपूर्ण परिस्थिती मानवी विकास प्रक्रियेवर परिणाम करत असते आणि एखाद्या व्यक्तीचा ट्रिगर पॉइंट देखील ठरवते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचे ट्रिगर पॉईंटस वेगवेगळे असू शकतात आणि त्याचे सामान्यीकरण केलं जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीची कारणं आणि वैयक्तिक प्रवास समजून घेतल्यास त्याच्या/तिच्यासाठी संभाव्य पूर्वगत गोष्टी काय असू शकतात याची फक्त झलक मिळू शकते.  

          आयुष्य जगत असताना प्रत्येक जण  सतत लहान-मोठ्या गोष्टींवर निर्णय घेत असतो आणि जो तो आपल्या निर्णयावर खूप ठाम असतो कारण तो जगाबद्दलच्या त्याच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून घेतलेला असतो. अनेकदा आपण  इतरांचे दृष्टिकोन समजून घेण्यात आणि त्याबद्दल सहानुभूती (Empathy) दाखवण्यात अपयशी ठरतो. आपण आपल्या कल्पना आणि मूल्यं इतर प्रत्येकासाठी सामान्यीकृत करतो. यामुळे अगदी सामान्य माणसाच्या आयुष्यात ही परस्पर संघर्ष निर्माण होतो. ही संपूर्ण प्रक्रिया अशा व्यक्तींसाठी मात्र अधिकच जटिल आणि त्रासदायक बनते, ज्या आयुष्यात आधीच कठीण गोष्टींना सामोऱ्या जात असतात. या क्लायंटस् ना भेटून मला समजलं की मानसशास्त्र empathy वर इतकं केंद्रित का आहे. मानसशास्त्राची एक नावशिक्षित विद्यार्थीनी या नात्यानं, मला नेहमी वाटायचं की, दरवर्षी पाठ्यपुस्तकात Empathy, unconditional positive regard इत्यादी मूल्यं का शिकवली जातात?  त्यावर का विशेष लक्ष केंद्रित केलं जातं? मात्र आता हे कळून चुकलं की ही मूल्यं अत्यंत मूलभूत आहेत. ही सरासरी कार्यशील माणसातही परस्पर संघर्ष निर्माण करू शकतात. आणि ही संपूर्ण प्रक्रिया एखाद्या व्यक्तीसाठी अधिक जटिल आणि त्रासदायक बनते जेव्हा ती आधीच आयुष्यात कठीण गोष्टींना सामोरी जात असते. या क्लायंटस् च समुपदेशन माझ्यासाठी फारच अर्थपूर्ण आणि महत्वाचं ठरलं कारण Empathy ला मानसशास्त्रात केंद्रस्थानी का ठेवण्यात आलं आहे याचं मला व्यक्तिशः आकलन झालं. अन्यथा मानसशास्त्राची नवोदित विद्यार्थिनी म्हणून मला दरवर्षीच्या पाठ्यपुस्तकात Empathy, unconditional positive regard  वगैरे शिकविण्यावर आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यावर ईतका भर का दिला जातो असा प्रश्न पडत असल्याचा उल्लेख या आधीच केला आहे. ही मूल्यं आत्यंतिक मूलभूत आणि उपजतच आहेत त्यामुळे मानसशास्त्रज्ञ म्हणून ही मूल्यं शिकवण्याची आणि सराव करण्याची गरज का आहे. मात्र या अनुभवानं मला शिकवलं की ही मूल्यं सरसकट आणि सर्वकाळ अंगिकारली जात नाहीत. बरेचदा ती काही निवडक लोकांबाबतच दाखवली जातात आणि  समाजातल्या मोठया वर्गाला या मूल्यांपासून वंचितच राहण्याची वेळ येते. मनोहरची कहाणी ऐकल्यावर माझ्या मनात सहजच विचार आला की मनोहर आणि त्याच्या वडिलां मधला संघर्ष, कुटुंबियांची अथवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीची हत्या करण्यासाठी उद्युक्त होण्या इतका खरंच मोठा होता का? एखाद्यावर हल्ला करण्याचा किंवा एखाद्याला साधी इजा पोहोचवण्याचा निव्वळ विचारही आपल्यापैकी बहुतेकांसाठी मनाला क्लेशकारक ठरतो तर मग काही लोक  इतके अनियंत्रित कसे होतात? प्रदीर्घ काळ, प्रचंड तणावपूर्ण अवस्थेत जीवन जगत आल्यानेच मनोहर कडून अशी टोकाची कृती घडल्याचा माझा निष्कर्ष होता.

          मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्याचा पुनरुच्चार तत्ववेत्ते सतत करीत असतात. याचा मतितार्थ असा की  सामाजिक स्वीकृती आणि सामाजिक समर्थन ही प्रत्येकाची गरज आहे. तथापि, परस्पर सुदृढ मानवी संबंधांच्या अभावा मुळे काहीवेळा बालपणी मनावर झालेले परिणाम प्रौढावस्थेत ही टिकून राहतात आणि सतत नकोश्या भावनांच ओझ मनात बाळगल्या मुळे कित्येकदा भावनिक संवेदना नियंत्रणात राहत नाहीत, आणि यामुळे आगळीक घडू शकते. मनोहर बरोबरच्या सत्रा नंतर मन - मस्तिष्क या विचारांत गुंतलं असतानाच पुढच्या सत्राची वेळ झाल्यानं हे सर्व मी अंतर्मनात नोंदवून ठेवलं.

          जेल मधल्या रहिवाश्यांबरोबरच्या या समुपदेशन सत्रांना मी आता सरावत होते. पुढचा पेशंट होता संतोष. तोही कलम 302 खाली म्हणजेच मानवी हत्येच्या गुन्ह्या साठी शिक्षा भोगत होता. खुनाच्या आरोपाखाली चुकीच्या पद्धतीनं आपणाला दोषी ठरवण्यात आल्याची त्याची भावना होती. तुरुंगातून सुटका होण्याबाबत तो आशावादी होता. भोगत असलेल्या शिक्षेबाबत त्याच्या मनात तीव्र संताप होता. संतोष एका गरीब कुटुंबातला होता. त्याच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले होते. आई रोजंदारीवर काम करत असे. त्याचा भाऊ कुठल्याश्या रेस्टॉरंट मध्ये वेटर होता आणि तो स्वतः वयाच्या 18 व्या वर्षां पासून दिवसा रिक्षा चलावित होता आणि रात्री अभ्यास करीत असे. एकूणच कुटुंबाला आर्थिक संकटाशी दोन हात करावे लागत होते. यामुळे तो प्रचंड तणावा खाली होता. ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याआधीच तो मद्यपींच्या संगतीत  सापडला आणि नियमितपणे दारू पिऊ लागला. पुढे लवकरच ड्रग्जपर्यंत मजल गेली. अत्यंत नाजूक वयातच त्याला अंमली पदार्थांच्या सेवनाची सवय लागली. एक दिवस त्याला अपघातही झाला आणि  डोक्याला दुखापत झाली.  परिस्थितीमुळे दुखपतीकडे दुर्लक्ष झालं. काही आठवड्यां नंतर त्याला आवाज ऐकू येऊ लागले आणि  झोप न लागणे, चिडचिड होणे इत्यादी काही लक्षणं दिसू लागली. दारू आणि अंमली पदार्थांच सेवन न करण्याबद्दल आईने दिलेल्या चेतावणी कडे त्यानं साफ दुर्लक्ष केलं. जसजसा वेळ निघून गेला तसतशी लक्षणं तीव्र होत गेली.  त्यानं सांगितल की एक दिवस त्याला अज्ञात नंबरवरून एका व्यक्तीच्या तपशीलासह लिखित संदेश आला की अमुक एका व्यक्तीला जिवानिशी मारलं तर त्याला मोठी रक्कम दिली जाईल. त्या दिवसापासून  संदेश देणाऱ्या आवाजाचा पुनरुच्चार होऊ लागला. तो सांगत होता की त्याला ऑफर स्वीकारण्याचे निर्देश येऊ लागले. अखेरीस त्यानं ऑफर घेण्याचं ठरवलं आणि त्या व्यक्तीची हत्या केली. हा मेसेज कोणाला दाखवला होता का किंवा तो मेसेज मोबाईल मध्ये आहे का असं विचारलं असता, तो कोणताही मेसेज दाखवू शकला नाही. त्यानं मेसेजबद्दल कोणालाही काही सांगितलं नव्हतं. त्यानं मारलेल्या व्यक्तीचा तपशील  संदेशाद्वारे पाठविला होता, तो देखील उपलब्ध नव्हता. अखेरीस त्याला मनोविकार असल्याचं निदान झालं. अशा घटना संदेहास्पद भासतात. संतोषला hallucinations होत होती. तो ह्या गुन्ह्यासाठी जबाबदार आहे हेच मुळी त्याला मान्य नव्हतं. त्यामुळे तो संतप्त, आस्वस्थ होता. आपण निर्दोष आहोत हे लोकांना कसं पटवून द्यायचं या विचारांनी त्याला रात्र रात्र झोपही लागत नसल्याचं त्यानी सांगितलं. अशी प्रकरणं मला अंतर्मुख करतात. अशा परिस्थितीत योग्य-अयोग्याचा नेमका निवाडा कसा करायचा असा प्रश्न मला पडतो. अश्या घटनान मध्ये आपण न्याय निवाडा कसा करणार? मी ज्या ज्या जेल रहिवाश्यांशी संवाद साधला, त्या जवळ जवळ सर्व लोकांच्या  व्यक्तिगत कहाण्या अत्यंत व्यथित करणाऱ्या होत्या. ते मर्यादित जागेत बंदिस्त जीवन जगात होते, त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा होत्या आणि सहकारी कैद्यांशी वारंवार त्यांचा शाब्दिक आणि प्रसंगी शारीरिक संघर्ष घडत होता.

          मी कोविड महमारीच्या काळात आर्थर रोड कारागृहात  कैद्यांसाठी समुपदेशन सत्र घेत होती. कोव्हिड मुळे भेटीगाठींवर कठोर निर्बंध होते. कैदी प्रदीर्घ काळ आपल्या कुटुंबियांना, प्रियजनांना भेटुही शकले नव्हते. त्यामुळे साहजिकच अधिक तणावाखाली होते. शिवाय कोर्टात हजर होऊन परत जेल मध्ये आल्यावर प्रत्येक वेळी तुरुंग अधिकारी त्यांना वेगळं ठेवत. त्यांच्या जीवनातला प्रचंड एकाकीपणा मला जाणवत होता. या एकाकीपणा मुळेच कि काय त्यांना बोलतं करण्यासाठी मला काही विशेष प्रयत्न, rapport  निर्माण करावा लागला नाही. मला मनापासून वाटलं की, सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत असलेले हे लोकही सामान्य माणसं सारखेच बोलतात. ते इतके एकाकी होते की त्या त्या दिवशी त्यांना “तुम्हाला कस वाटतंय” एवढच विचारल, तर त्यांनी इतकी सगळी खासगी माहिती सांगितली. जणू काही आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो होतो. त्यांचा भावनिक कोंडमारा इतका जबरदस्त होता की कुणी ऐकतो आहे म्हंटल्यावर ते काही गोष्टींबद्दल किंवा अयोग्य वर्तनाबद्दल ही मोकळेपणानं बोलते झाले. काही दोषी ठरलेल्यानीं तर गुन्हा घडल्याबद्दल खेदही व्यक्त केला. आणि आता आपल्या कृत्याबद्दल ते पश्चाताप करत होते. जशी जशी मी अन्य कैद्यांना भेटत गेले आणि त्यांच्या जीवनातील दैनंदिन अश्या समस्यांवर चर्चा करत गेली, उदाहरणार्थ झोप न लागणं, भूक न लागणं  इत्यादी,  तेव्हा ह्या कैद्यांप्रती empathy, genuineness मी दाखवू शकणार नाही अशी सुरवातीला मनात असलेली शंका हळू हळू नाहीशी होत गेली.

पुढे काही दिवसांनंतर, जेव्हा मी काही नवीन कैद्यांशी बोलले, तेव्हा त्यांना जरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी त्या वातावरणाची सवय झाल्यामुळे म्हणा किंवा पहिल्या भेटीतला नावखेपणा सरल्यामुळे म्हणा, "मला झोप येत नाही. खुनाचा दोषी ठरवण्यात आल्याबद्दल राग येतो. माझी काही चूक नव्हती" वगैरे कोणी सांगू लागला की मी फक्त लक्षणांवर केंद्रित होऊ लागली. 'भावनिक अस्वस्थतेमुळे झोप येत नाही' हेच माझ्यासाठी महत्वाचे असे. त्यांच्या कहाणीतला गुन्हेगारीचा संदर्भ केंद्रस्थानी येत नसे. त्या संदर्भात आम्हा समुपदेशकांच्या गटचर्चे दरम्यान विचारविनिमय होत असे. एक गोष्ट नक्की की यांच्यापैकी कोणीही मूलतः वाईट नव्हतं. त्यांनी वारंवार चुकीचे निर्णय घेतले आणि अशा काही कृती केल्या, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागलं या बाबतीत मला कुठलीही शंका उरली नाही. 

          क्लायंट म्हणून मी पाहिलेले बहुतेक जेल मध्ये असणारी एकतर अल्कोहोल किंवा ड्रग्सचं सेवन करत होते आणि तुरुंगात गेल्यानंतर दारू किंवा दुसरे मादक पदार्थ न मिळाल्यामुळे त्यांच्यात  विड्रॉवल सिम्प्टमस (Withdrawal Symptoms) दिसायचे. नैतिक आधारावर समाजानी बहिष्कृत केलेल्या मात्र समाजाचेच एक घटक असलेल्या अशा सामाजिक घटकांशी समुपदेशनाच्या निमित्तानं मी व्यतीत केलेला वेळ माझं अनुभव विश्व समृद्ध करून गेला. ही फारच मोलाची मिळकत होती. या संपूर्ण प्रकल्पानं मला मानव आणि समाज घटक या नात्यानं काही मूलभूत मूल्यांची उजळणी करण्यास प्रवृत्त केलं. या लोकांना भेटल्या नंतर, माझ्याही नकळत असलेल्या माझ्या निर्णय प्रकियेतल्या पूर्वग्रहांच दर्शन मला घडलं. या प्रकल्पानी मला दिलेली सर्वात सुंदर भेट म्हणजे मी माणसाला माणूस म्हणून पाहायला शिकले.

 

शिवानी सप्रे

समुपदेशक 

shivaninsapre@gmail.com

9833002434

 

Comments

  1. Great experience, valuable thoughts, insightful tale. overall enriching and satisfying reading experience. Pl keep writing. God bless.

    ReplyDelete
  2. expecting many more thoughts and tales

    ReplyDelete
  3. आयुष्यातील एका उपेक्षित घटकावर लिहीलेला हा लेख. कित्येक पंडितांची व्यथा सांगणारा, मांडणारा हा लेख. एक वेगळाच, पण तितकाच महत्त्वपूर्ण असा Perspective मांडून समाजाला विचार करायला लावणारा आणि समाजव्यवस्थेत बदल घडवू पाहणारा हा सुंदर असा लेख. मन:पूर्वक आभारी आहे. विचारविमर्श करायला लावून दृष्टिकोन बदलायला लावून अंतर्मुख केल्याबद्दल. अशा अनेक लेखांची प्रतिक्षा आहे.

    ReplyDelete
  4. Very well written.. it's catchy and the experiences you shared are worth reading..

    ReplyDelete
  5. Expecting many more thoughts and tales. God bless.👍🏻🙏

    ReplyDelete
  6. शिवानी,तुरूंग हे एक वेगळं जग आहे.तिथे गुन्हेगार म्हणून जाणारी व्यक्ती मानसिक दृष्ट्या संतुलन ढळलेली असणे हे स्वाभाविकच.अशा व्यक्तींना भेटले की प्रचंड अस्वस्थता येत असणार जी तुझ्या लेखनात ठळकपणे जाणवते.तू नवोदित मानसोपचार करणारी असल्याने तुला हा सगळा अनुभव अगदी विचलित करणारा वाटला असणार.तू चांगल्या व्यक्त केल्या आहेस तुझ्या भावना व विचार.आता तुझ्या लेखनात अधिक टोकदारपणा येण्यासाठी लेखनाचा विस्तार कमी ठेव आणि एखादीच केस अधिक सखोलपणे लिही.शुभेच्छा पुढील लेखनासाठी !

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawaad Ma'am, Pudhchya blog sathi nakki lakshat theven!

      Delete
  7. संधी व भय या दोन्ही एकाच वेळेस उपलब्ध असतात. निवड आपली असते. तुम्ही संधी निवडली. म्हणून तुम्हाला अनुभव मिळाला. व तुम्ही तो खुपचं चांगल्या पद्धतीने लिहिला आहे. क्षणिक भावना उद्रेक होऊन होतो, तो गुन्हा तात्पुरत्या स्वरुपाचा असतो. खरे गुन्हेगार हे सातत्याने कायदा मोडत असतात. आपल्या कडे सत्व, रे व तमोगुण असतात. क्षणिक उद्रेक होऊन, तामसी माणूस विकाराच्या अधिन होऊ शकतो व गुन्हा करतो. व कदाचित उर्वरित आयुष्य पश्चात्ताप करत बसतो. पण काही निर्ढावलेले गुन्हेगार असतात. तुम्हाला असे अनेक अनुभव मिळाले असतील. हेच अनुभव तुम्हाला समृद्ध करतील व त्याचा उपयोग समाजासाठी नक्की होईल. परत एकदा उत्तम लेखासाठी अभिनंदन.

    ReplyDelete
  8. Shivani kiti kautuk Karu?Tuze anubhav आत्यंतिक मौलिक आहेत.ते शब्दबद्ध केलेलं पाहून तू मराठी इतकं छान लिहितेस,खरंच खूप खूप आनंद झाला. अशीच लिहीत रहा. Hardasach por सुरावराच radata.Hi kala vrdhit kar.abhinandan.

    ReplyDelete
  9. शिवानी.... एका वेगळ्याच विश्वाचं दर्शन घडवलंस. तुझं कौतुक वाटतंय. असेच तुझे अनुभव शेअर करत रहा... खूप खूप शुभेच्छा 💐❤😊

    ReplyDelete
  10. खूप वेगळं विश्व या लेखातून उलगडले. गुन्हा या शब्दाच्या व्याख्येप्रमाणे समाजातील अधिक लोक गुन्हेगारांना बहिष्कृत करतात. परंतु त्यांचाही मानव म्हणून विचार करणं व त्यांना भावनिक गर्तेतून बाहेर काढायला हवं आहे हे कळत होते पण आता गरजेचं वाटू लागले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Lihla te tumchyaparyanta pohochla aikun bara vatla!!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

बंदियों में बसे इन्सान